देवरूख: तहसीलदार कार्यालय, पुरवठा शाखेमार्फत नवीन शिधापत्रिकांसाठीच्या निकष व कार्यपद्धतीद्वारे विहित शासननिर्णय तसेच परिपत्रकांन्वये सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तीन रंगांच्या शिधापत्रिका नागरिकांना देण्यात येतात.
या संदर्भात काही गैरप्रकार निदर्शनास आले असून नागरिकांनी नियमानुसारच शिधापत्रिकांची कामे करावीत, असे आवाहन तहसीलदार अमृता साबळे यांनी केले आहे.
अलीकडील काळात शिधापत्रिका विभक्त करतेवेळी कुटुंब संकल्पना विचारात न घेता एक व्यक्ती शिधापत्रिकेची मागणी करणे तसेच धान्याचा लाभ कायमस्वरूपी चालू राहण्याकरिता धान्याचा लाभ घेत असलेल्या शिधापत्रिकेतून शासकीय/खासगी नोकरी करत असलेल्या व्यक्ती यांना विभक्त दाखवण्यात येत आहे. अशा प्रकरणी एकत्र राहत असूनही एकाच घर क्रमांकावर एकापेक्षा अधिक शिधापत्रिकेची मागणी करण्यात येत आहे; सदर शिधापत्रिकांचा गैरवापर करून निराधार असल्याचे दाखवून संजय गांधी योजनांचा लाभ घेणे तसेच धान्याच्या लाभाची मागणी करणे असे प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
बोगस, बनावट शिधापत्रिकांचे प्रकार टाळता यावे यासाठी चुकीच्या माहितीच्या आधारे पुरवलेल्या शिधापत्रिका शोधून काढून त्या रद्द करण्यासाठी शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात येणार आहे. नवीन शिधापत्रिका प्रकरणीसोबत सादर केलेली कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रातातील तपशील सत्य आणि वस्तुनिष्ठ असावा याबाबतीत काही दिशाभूल करण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे तहसीलदारांनी सांगितले.