चिपळूण:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरूवारी कोकण दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंनी पक्षबांधणी संदर्भात दापोली, चिपळूण आणि खेड येथील मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी खेडमध्ये भाषण करताना एकला चलोचा नारा दिला आहे.
आपल्याला कुणाशी युती नको, ना कुणाच्या भानगडी नको. ऐन मोक्याच्या वेळी मला तुमची साथ हवी आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
मला तुमची साथ हवी आहे, ऐन मोक्याच्या वेळी सर्वांची साथ हवी आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आत्तापर्यंत जे झालं ते झालं. आता नगरपरिषदेच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत. कोणाच्या युत्या नको तसल्या भानगडीच नकोत. मला खात्री आहे की, आपण मनसे म्हणून खेडमध्ये जेव्हा निवडणुका लढवू, तेव्हा खेडमधील जनता आपल्याला निश्चित यश देईल, असं राज ठाकरे म्हणाले.
17 वर्षे झाली तरी आपल्या कोकणातला रस्ता का होत नाही? समृद्धी महामार्ग जर साडेचार वर्षात पूर्ण होत असेल तर आपल्या कोकणातला रस्ता 17 वर्षे झालं तरी पूर्ण का होत नाही. मागच्या वेळी आलो तेव्हा नितीन गडकरींना फोन केला, तेव्हा त्यांनी सांगितले की स्थानिक कॉन्ट्रॅक्टर पळून गेले आहेत. कोकणवासियांना काहीतरी वेगळे देण्यासाठी मी तुमच्या मनगटात ताकद देण्याचा प्रयत्न करतो आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
कोकणात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत. आपण हे सगळं निपूटपणे भोगतो. एवढ्या सगळ्या गोष्टी भोगल्यानंतर, आपण पुन्हा त्यांनाच मतदान करण्यासाठी रांगेत उभं राहतो. अनेक आमदार-खासदार निवडून देता. अनेकदा तेच तेच लोक पुन्हा निवडून देता. याचं मला आश्चर्य वाटतं, असंही राज ठाकरे म्हणाले.