जाकादेवी:- येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेमार्फत सामाजिक उपक्रमांतर्गत जाकादेवी येथे डासनिर्मूलन फवारणी मोहीम राबविण्यात आली. जाकादेवी ग्रामपंचायतीने त्यासाठी भरीव सहकार्य केले.
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचा ठेववृद्धी मास सध्या सुरू असून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनेला लाभला आहे. या मासानिमित्ताने पतसंस्थेमार्फत सर्वत्र संपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. समाजातून ठेवी गोळा करतानाच समाजासाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याचे धोरणही संस्थेने ठेवले आहे. याअंतर्गत संस्थेने जाकादेवी आणि पावस येथे डास निर्मूलन फवारणी मोहीम राबण्यिाचे ठरविले. त्याची सुरुवात आज जाकादेवी येथे जाकादेवी- खालगाव ग्रामपंचायतीच्या साह्याने करण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जाकादेवी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये फवारणी करण्यात आली.
जाकादेवी येथे पतसंस्थेची शाखा गेली १९ वर्षे कार्यरत असून जाकादेवी ग्रामस्थांनी शाखेला सातत्याने भरीव सहकार्य केले आहे. या पार्श्वभूमीवर जाकादेवी ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त अशी डासनिर्मूलन फवारणी आज करण्यात आली.
यावेळी जाकादेवीचे सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर, संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, जाकादेवी शाखेचे शाखाधिकारी सुमित घाणेकर, पिग्मी प्रतिनिधी प्रशांत सावंत आणि जाकादेवीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.