खेड:-कशेडी बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या गणोशोत्सवाआधी हा बोगदा सुरु होण्याची शक्यता आहे. यंदाच्या गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर होण्याची शक्यता आहे.
हा बोगदा सुरु होणे हे मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसनंतर कोकणाला मिळालेली दुसरी अनोखी भेटच आहे.
सन 2019 मध्ये रत्नागिरी जिलह्याचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते उद्घाटन होऊन या बोगद्याचे काम सुरु झाले. त्यांनतर कोरोनाचे संकट आले. परिणामी बोगद्याच्या काम कासव गतीने सुरु होते. गेल्या काही वर्षांपासून या बोगद्याच्या प्रतिक्षेत चाकरमनी होते. महाराष्ट्रात सत्तांतर झाले. पण या बोगद्याचे काम काही पूर्ण होत नव्हते. शिंदे- फडणवीस सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दोन वेळा या बोगद्याच्या कामाचा आढावा घेतला. हे काम लवकरच पूर्ण होईल, अशी ग्वाही मंत्री चव्हाण यांनी दिली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मुंबई-गोवा महामार्गाची हेलिकॉप्टरमधून णी केली होती.
आता या बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या बोगद्याच्या काँक्रेटीकरणाचे काम उल्हासनगरच्या ‘जय भारत’ या कंपनीने सुरु केले आहे. तयार काँक्रीट रस्त्याला पाणी लागल्यास सिमेंट वाहून जाऊन रस्ता खराब होतो त्याचा दर्जा ढासळतो. हे टाळण्यासाठी तयार झालेल्या रस्त्याला पावसाचे पाणी लागू नये म्हणून 15 मीटर लांबीचे दोन शेड बनवत काँक्रीटीकरण काम मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आले आहे.
वळणावळणाच्या घाटापासून होणार सुटका
केशडी बोगदा सुरु झाल्यास गणोशोत्सवात चाकरमान्यांचे हाल होणार नाहीत. कारण केशडी घाटाचे अंतर पूर्ण करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ लागतो. त्यात घाटात वळणावळणाचे रस्ते आहेत. घाटात एखादी गाडी बंद पडली तर येथील सर्वच वाहतूक ठप्प होते. तासंतास वाहतूक खोळंबते. पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती अधिक असते. त्यामुळे गणेशोत्सवात या मार्गावरुन जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होतात. मात्र हा बोगदा तयार झाल्यानंतर या मार्गावरील प्रवास अधिक सुखकर होणार आहे.