चिपळूण:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे येथील वहाळ फाटा येथे रस्त्यालगत असलेल्या घरावर कंटेनर कलंडल्याची घटना बुधवारी सकाळी 7 वाजता घडली. या घटनेत घराचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने घरातील कोणालाही दुखापत झालेली नाही.
वहाळ फाटा येथील रहिवासी शशिकांत आत्माराम वारे यांचे घर महामार्गालगत आहे. घरासमोर भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहने सर्व्हिस रोडने ये-जा करतात. बुधवारी चिपळूणकदून रत रत्नागिरीकडे निघालेल्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला व कंटेनर रस्त्याकडेला येऊन नजीकच्या घरावर कलंडला. या घटनेमुळे वारे कुटुंबीयांमध्ये गोंधळ उडाला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता घराच्या पडवीवर कंटेनर कलंडल्याचे दिसले. या घटनेमुळे घराची कौले व भिंतीचे नुकसान झाले आहे. याविषयी सावर्डे पोलिसांना माहिती देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला.