दापोली:-दापोली तालुक्यामधील विसापूर येथून एकाच कुटुंबातील बेपत्ता झालेल्या चौघांपैकी भरत भेलेकर यालाही ताब्यात घेण्यात दापोली पोलिसांना यश आले आहे.
विसापूर येथून 2 जुलै रोजी भरत भेलेकर बेपत्ता झाला होता. दुसऱ्याच दिवशी त्याची पत्नी व दोन मुलेही अचानक न सांगता निघून गेले होते. या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात एकाच कुटुंबातून चौघे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. यातील तिघांना दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस अंमलदार विकास पवार यांनी ठाणे येथून परत आणण्यात यश मिळवले होते. तर आता यातील चौथा इसम भरत भालेकर याला कुंभवे येथून ताब्यात घेण्यात पवार यांना यश आले आहे. घरात होणाऱ्या नेहमीच्या भांडणांना त्रासून हे सर्वजण कोणालाही न सांगता घर सोडून गेल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. चारही जणांना पोलिसंनी सुखरूप घरी आणल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.