रत्नागिरी:-गणेशोत्सवातील संशयास्पद युजर आयडी आणि पीएनआरमधून आरक्षित झालेली ७५० तिकिटे रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. शिवाय या तिकिटांचे पैसे प्रवाशांना परत मिळणार नाहीत.
गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणार्या रेल्वेगाड्यांच्या आरक्षणात काळाबाजार झाल्याच्या आलेल्या तक्रारीनंतर मध्य रेल्वेने तिकिट आरक्षणाची सखोल तपासणी केली. या तपासणीत संशयास्पद युजर आयडी आणि पीएनआरमधून आरक्षित झालेली ७५० तिकिटे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही तिकिटे रद्द केलेल्या प्रवाशांना परतावाही मिळणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोकण मार्गावर गणेशोत्सात धावणार्या गाड्यांचे आरक्षण खुले झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच आरक्षण फुल्ल होऊन आरक्षित तिकिटासाठी तासन्तास तिकिट खिडक्यांवर रांगेत उभ्या राहणार्या चाकरमान्यांच्या पदरी निराशाच पडली होती. अवघ्या ४ मिनिटांतच १५ ते २१ सप्टेंबर या कालावधीसाठी ३५ हजार ४०६ जागांच्या उपलब्ध क्षमतेच्या तुलनेत तब्बल ५४ हजार ४०१ जागांचे बुकिंग झाले. त्यात ५ हजार ८७५ प्रवाशांनी काऊंटरद्वारे तर ४८ हजार ५२६ प्रवाशांनी ऑनलाइन बुकिंग केले होते. यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या चाकरमान्यांना निश्चित आरक्षण मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
या आरक्षणात झालेल्या सावळ्या गोंधळासह दलालांद्वारे तिकिटे बुक झाल्याने गणेशोत्सवातील कोकणातील रेल्वेगाड्यांच्या आरक्षणात काळाबाजार झाल्याच्या तक्रारी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राज्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत गणेशोत्सवातील आरक्षित तिकिटांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मध्य रेल्वेने तिकिट आरक्षणाची तपासणी केली. यादरम्यान दर सेकंदाला २६६ तिकिटे याप्रमाणे आरक्षण सुरू होताच पहिल्या ४ मिनिटांतच ५४ हजाराहून अधिक तिकिटांचे आरक्षण झाल्याचे समोर आले. याशिवाय काही युजर आयडी आणि पीएनआर संशयास्पद आढळले होते. संशयास्पद आढळलेले पीएनआर बिहार आणि उत्तऱ भारतातील रेल्वेस्थानक परिसरातील असल्याचे उघड झाले होते.