रत्नागिरी: रत्नागिरीत लवकरच फिरते पशुचिकित्सा पथक उपलब्ध होणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत पशुस्वास्थ्य आणि रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करण्यात येणार आहे.
त्यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यात एकूण ८० पथकांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कोकण विभागात ९ पथके होणार असून त्यामध्ये रत्नागिरीचा समावेश आहे.
या फिरत्या पशुचिकित्सा पथकांचे संनियंत्रण करण्यासाठी राज्य स्तरावर पुण्यात कॉल सेंटर स्थापन करण्यात येणार असून १९६२ या टोल फ्री क्रमांकाद्वारे नागरिकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. यासाठी नागपूरच्या पशुधन विकास मंडळामार्फत स्वतंत्र वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्याद्वारे सेवा देण्यास मर्यादा येतात. अशा भागात या योजनेतून सेवा पुरविण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. वाहनांची देखभाल आणि इंधन खर्चासाठी दरमहा ३३ हजार तर औषधांसाठी ३५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या वाहनाबरोबर चालक तथा परिचर, पदवीधर पशुवैद्यक आणि पशुधन पर्यवेक्षक असे कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. साथरोग नियंत्रण, अन्य उपचार करण्याबरोबरच हे पथक कृत्रिम रेतन, जनजागृती, प्रसार कार्यातही सहभागी होणार आहे.