लांजा:- महाराष्ट्र साहित्य परिषदेची लांजा शाखा आणि लोकमान्य वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि. १५ जुलै) रोजी लांजा येथे गोमंतकीय प्रसिद्ध कवींचा ‘गंध मातीचा…छंद कवितेचा’ या गोमांतकीय कविता आणि लोकवाङ्मयीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोमंतकीय लोकसाहित्याच्या प्रसिद्ध अभ्यासिका पौर्णिमा केरकर, गझलकार प्रकाश क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्त्या कवयित्री चित्रा क्षीरसागर, गोव्यातील साहित्य विश्वात आपल्या साहित्यकृतींनी मुद्रा उमटविणाऱ्या दीपा मिरिंगकर, आसावरी कुलकर्णी, शुभदा च्यारी, रजनी रायकर आणि विठ्ठल कुसाळे हे मराठी आणि कोकणीत लेखन करणारे साहित्यिक ‘गंध मातीचा …छंद कवितेचा ‘ या कार्यक्रमातून गोमंतकीय भूमीचे लोकवाङ्मयाचे दर्शन काव्यधारांमधून घडविणार आहेत.
हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता लांज्यात पोस्ट ऑफिससमोरील माऊली हॉलमध्ये होणार आहे. गोमंतकीय मराठी आणि कोकणी तब्बल आठ कवी एकाच मंचावर लांज्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मसापच्या विजयालक्ष्मी देवगोजी, विजय हटकर, लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. अभिजित जेधे, योगेश वाघधरे, उमेश केसरकर मेहनत घेत आहेत. श्रावणधारांसह साहित्याचा आनंद घेण्यासाठी लांजा तालुक्यातील साहित्यरसिकांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन मसापच्या लांजा शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ञ विलास कुवळेकर यांनी केले आहे.