आता पर्यंत १० हजार २१५ हेक्टरवर भातलावण्या पूर्ण
रत्नागिरी:-मोसमी पावसाची सुरवात उशिरा झाल्यामुळे भातलावण्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. आठ दिवस समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पुन्हा उघडीप दिल्यामुळे जिल्ह्यातील लावण्यांचा वेग मंदावणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर १० हजार २१५ हेक्टरवर भातलावण्या पूर्ण झाल्या आहेत.
मागील आठ दिवसांच्या तुलनेत मंगळवारी आणि बुधवारी जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. २४ जूनपासून मोसमी पावसाला सुरवात झाली. त्यानंतर सलग पाऊस पडत होता. गेल्या दोन दिवसात पावसाने उघडीप घेतली आहे. मोसमी पाऊस लांबल्यामुळे पेरण्या उशिराने झाल्या. त्यामुळे भातलावण्यांचे वेळापत्रक पुढे सरकले आहे. जूनच्या सुरवातीच्या आठवड्यात पेरण्या केलेल्या काही ठिकाणी पुरेशी रूजवातच झालेली नाही. आता पुन्हा दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. पेरणीनंतर कमी कालावधीत तयार झालेली रोपं लावणीसाठी वापरावी लागणार आहेत. जुलैचा पहिला आठवडा पूर्ण झाला तरीही लावण्यांच्या कामाला वेग आलेला नाही.
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार २१५ हेक्टरवर भातलावण्या पूर्ण झाल्या असून, तुलनेत १५ टक्के लावण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात ६८ हजार ८८ हेक्टरवर लागवड केली जाते. उशिरा आलेल्या पावसामुळे पेरण्या जूनच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होत्या. सर्वसाधारणपणे ७ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या तसेच खरिपातील अन्य पिकांमधील १० हजार ३९८ हेक्टरपैकी ५१४ हेक्टरवर लावगवड झाली आहे. ४.९५ टक्के लागवड झाली आहे.
तालुका एकूण क्षेत्र भातलावण्या क्षेत्र (हेक्टर)
चिपळूण १०३१७ १००५
दापोली ६४१३ ५८०
खेड १०१५८ २३५०
गुहागर ३८८९ ३८८
मंडणगड ३९८० ३९७
रत्नागिरी ६८३३ ५३०
संगमेश्वर ११५२८ १०५०
राजापूर ८५३१ ३४१२
लांजा ६४३५ ५००