संगमेश्वर /प्रतिनिधी:- कला शिक्षकांनी एक शिल्पकार घडवला तर तो २५ जणांना रोजगार देतो . आपण २ फुटांपासून ६३ फूट उंची पर्यंतची शिल्प घडवली आहेत . देशाच्या विविध भागात आपली शिल्प आहेत . आपल्या कार्यशाळेला भिंती नाहीत . येथील काम पहायला आपण केंव्हाही येवू शकता . शिल्प घडविण्याचा अनुभव हा प्रचंड मेहनतीचा असला तरीही तो प्रथम कलाकाराला आत्मानुभूती देणारा असावा असे प्रतिपादन चिपळूण येथील प्रसिध्द शिल्पकार संदीप ताम्हनकर यांनी केले .
रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघाच्या जयगड येथील कार्यशाळेत मातीकामाचे प्रात्यक्षिक सादर करताना ताम्हनकर हे बोलत होते . संदीप ताम्हनकर यांनी शिल्पकलेचे शिक्षण सह्याद्री कला महाविद्यालय सावर्डे येथे घेतले . गेली दहा वर्षे तेदीपा सावंत , संघटनेचे अध्यक्ष इमतियाज शेख व्यावसायिक शिल्पकार म्हणून काम करत आहेत अशी माहिती यावेळी कलाशिक्षक स्वरुप केळस्कर यांनी करुन दिली . यावेळी व्यासपीठावर जे एस डब्ल्यूचे अनिल दधीच , जेव्हीएमच्या तृप्ती वराठे , डाएटच्या दीपा सावंत , जिल्हा संघटनेचे इमतियाज शेख , राजन आयरे आदि मान्यवर उपस्थित होते .
प्रात्यक्षिक दाखविताना काय दाखवायचे ? हे आपण ठरवून आलो नव्हतो . मात्र आता शेतीचा हंगाम असल्यामुळे बळीराजाचा मित्र वृषभ म्हणजे बैलाचे प्रात्यक्षिक शाडूच्या माती मध्ये सुमारे तासाभरात दाखविले . आकार दाखवताना आपण विद्यार्थ्यांना कशी मुभा द्यायला हवी ? हेच या प्रात्यक्षिकात आपण प्रामुख्याने दाखविले आहे , असे ताम्हनकर यांनी सांगितले . शाळेत विविध कलांचा अंतर्भाव असल्याने माती काम करताना विद्यार्थ्यांना आकार तयार करायला मूभा द्यावी असे आवाहनही ताम्हनकर यांनी केले .
आपण शासकीय रेखाकला परीक्षा उत्तीर्ण होवू शकलो नव्हतो . महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अचानक कलाशिक्षक व्हावे असे वाटले . मात्र सह्याद्री कला महाविद्यालयात येताच ज्येष्ठ शिल्पकार चित्रकार प्रकाश राजेशिर्के सर यांनी आपण गणपती कारखाना चालवतो म्हणून शिल्पकलेचे शिक्षण घ्यायला लावले . राजेशिर्के सरांच्या मार्गदर्शनामुळेच आपण शिल्पकार होवू शकलो . जीवनात कलाटणी येणारा क्षण आपल्या आयुष्यात आला तसा कोणाच्याही येवू शकतो यासाठी शालेय स्तरावर असे कलाकार शोधण्याचे काम कलाशिक्षक करत असल्याबद्दल शिल्पकार संदीप ताम्हनकर यांनी समाधान व्यक्त केले .
जिंदल विद्या मंदिर जयगड येथे आयोजित शिल्पकला कार्यशाळा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कलाशिक्षक तुकाराम पाटील यांनी केले . संघटनेचे अध्यक्ष इमतियाज शेख , सचिव राजन आयरे यांनी संदीप ताम्हनकर यांचे आभार मानले . ज्येष्ठ कलाशिक्षक बिद्रीकोटीमठ सर यांच्या हस्ते संदीप ताम्हनकर यांना भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले . या कार्यशाळेचा लाभ जिल्ह्यातील ८७ कलाशिक्षकांनी घेतला . जे एस डब्ल्यूच्या संपदा धोपटकर यांचेही यावेळी सहकार्य लाभले .