136 कि.मीसाठी लागणार 27 हजार कोटी
रत्नागिरी:-भारतातील रक्सोलपासून नेपाळमधील काठमांडूपर्यंत ब्रॉड गेज रेल्वेमार्ग निर्मितीचा महत्वाकांक्षी प्रकल्प दोन्ही देशांच्या मान्यतेने हाती घेण्यात आल्याची घोषणा गतवर्षीच करण्यात आली होती. रक्सोल ते काठमांडू या 243 कि.मी. मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले होते. अंतिम अहवालानुसार 136 किमी. मार्गाला स्विकृती मिळाली आहे. आव्हानात्मक प्रकल्प हाताळण्यासाठी प्रसिध्द असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचीच यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यानुसार कोकण रेल्वेने या मार्गाचा अंतिम प्रकल्प अहवाल नुकताच सादर केला आहे.
भारत व नेपाळ या दोन्ही देशांच्या सरकारांनी 2018 साली या प्रकल्पाला सहमती दिली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली व कार्यवाहीच्या दृष्टीने पुढील पावले उचलण्यात आली होती. सुमारे 18 महिन्यांपूर्वी कोकण रेल्वेने या दोन ठिकाणांदरम्यान 4 विविध मार्गांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर केला होता. त्यापैकी सर्वात कमी म्हणजे 136 किमी अंतराचा पर्याय निवडून बोर्डाने कोकण रेल्ये महामंडळाला पुढील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या.
प्रस्तावित मार्ग रकसोल, वीरगंज, जीतपुर, निजगढ़ धूमरवाना, काकड़ी, चंद्रपुर, धीयाल, शिखरपुर, सिसनेरी, सथिकेल व काठमांडू सह एकूण 13 स्थानके प्रस्तावित आहेत. या मार्गावर एकूण 40 किमीच्या 32 बोगद्यांचा समावेश आहे. यातील सर्वात मोठा बोगदा 8 किमी लांबीचा असेल. यासह मार्गावर 39 ओव्हहेड ब्रिज तर 35 लहान-मोठ्या पुलांचा समावेश आहे. दोन्ही देशांतील व्यापार, पर्यटन वाढीसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
नेपाळ रेल्वे, कोकण रेल्वे यांच्याकडून संयुक्तपणे या मार्गाचे बांधकाम केले जाणार आहे. सुमारे 5 वर्षात हा मार्ग कायार्न्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.