संगमेश्वर/शांताराम गुडेकर:-स्वयंभू मार्लेश्वर प्रतिष्ठान-अध्यक्ष व मनसे विभाग अध्यक्ष श्री.अमित रेवाळे यांनी आंगवली ते मार्लेश्वर व मार्लेश्वर ते खडीकोळवण रोडच्या नुतनीकरण व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे.
गेली कित्येक वर्षे नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेला आंगवली ते मार्लेश्वर देवस्थान व कळकदरा हा रस्ता खड्डेमय रस्ता झाला आहे.या रस्त्याला मोठे मोठे खड्डे असून प्रवासी,भाविक तसेच रस्त्याला जोडलेल्या 10 ते 12 गावातील गरोदर माता,शालेय विद्यार्थी,कामगार वर्ग यांना वाहतुकीसाठी या खड्ड्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
राज्यात चालू असलेला सत्तेचा सत्तापालट कार्यक्रम पाहता नागरिकांच्या प्रश्नाचे व विकासकामांकडे आमदार, खासदार, मंत्री यांचे दुर्लक्ष तर होत नाही ना? असा प्रश्न पडला आहे.अजून किती वर्षे या मार्लेश्वर दशक्रोशीतील नागरिकांना स्थानिक प्रशासन आणि पुढारी गृहीत धरणार? याची दखल प्रशासन व पुढारी घेऊन आता तरी या गावांतील नागरिकांना व मार्लेश्वर तीर्थयात्रेला येणाऱ्या भाविकांना न्याय मिळेल का? असा प्रश्न अमित रेवाळे यांनी विचारला आहे.
श्रावण महिन्याच्या आत बांधकाम विभागाने नूतनीकरणाची वाट न पाहता त्वरित खड्डे बुजवावेत अशी मागणी संगमेश्वर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभाग अध्यक्ष श्री अमित रेवाळे यांनी केली आहे.
या वेळी उपविभाग अध्यक्ष व मारळ ग्रा. प. सरपंच यांचे चिरंजीव श्री सुजित गुरव उपस्थित होते. श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने मार्लेश्वर तीर्थक्षेत्र दर्शनासाठी भाविक येत असतात, त्यामुळे येणाऱ्या श्रावण महिन्याच्या आत जर याची दखल स्थानिक प्रशासन व बांधकाम विभागाने घेतली नाही तर श्रावण महिन्यातच मार्लेश्वर मंदिराजवळ रस्त्यावर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा विभाग अध्यक्ष श्री अमित रेवाळे व उपविभाग अध्यक्ष श्री सुजित गुरव यांनी दिला आहे.