नवी मुंबई/प्रतिनिधी:- देशभरातील समुद्र किनारे जलप्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याची ओरड होत असतानाच दुसरीकडे समुद्रात डॉल्फिन आणि व्हेलसारखे महाकाय मासे वावरत असल्याच्याही नोंदी झाल्या आहेत.
यामुळे आपल्या सागराची स्थिती ही सागरी जीवसृष्टीसाठी पोषक असल्याचे द्योतक असल्याचे दिसत आहे, असा दावा केला गेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे मुंबईसह कोकणच्या समुद्र किनाऱ्यांच्या प्रेमात डॉल्फिन आणि व्हेल मासे पडले आहेत. त्यांच्या प्रजातींची या किनारपट्टीवर नोंद झाली आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या भारतीय मत्स्य सर्वेक्षणच्या मुंबई विभागाकडून देण्यात आली.
मृत्यू कमी होणार
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना अनुदानित कार्यक्रमाचा एक भाग म्हणून माशांचे मृत्यू कमी करण्यासाठीच्या पद्धती शोधल्या जातात.
मत्स्योद्योग क्षेत्रात नीलक्रांती आणण्यासाठी २०२० ते २०२५ या काळाकरिता १० सप्टेंबर २०२० ला प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू झाली. ती २० हजार ५० कोटी खर्चाची आहे.
जेव्हा व्हेल समुद्राच्या पृष्ठभागाजवळ भक्ष्य पकडतात आणि त्यांची पोषक तत्त्वांनीयुक्त विष्ठा पाण्यात सोडतात. तेव्हा ते पृष्ठभागाजवळचे पाणी समृद्ध करतात. फायटोप्लँक्टनच्या वाढीस चालना देतात. त्यामुळे संपूर्ण अन्न साखळीला फायदा होतो.
१३ कोटी…
मत्स्यव्यवसाय विभाग, मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने या प्रकल्पासाठी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत १३ कोटी २८ लाख ९३ हजार ७४० रुपये मंजूर केले आहेत.