रत्नागिरी/प्रतिनिधी:-सीए इन्स्टिट्यूटची रत्नागिरी शाखा कोकणात भूषण ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सीए एच. एल. पटवर्धन यांनी केले. रत्नागिरी शाखेचे कार्यालय आता जोगळेकर कॉलनी येथून शिवाजीनगर येथील भोसले प्लाझा येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
या नवीन शाखेचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित छोटेखानी कार्यक्रमात सीए पटवर्धन बोलत होते.
यावेळी ७५ वा सीए दिन साजरा करण्यात आला. यावेळी रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मुकुंद मराठे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ते म्हणाले की, आज सीए दिन, सीए इन्स्टिट्यूटच्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारंभ आणि रत्नागिरी शाखेचे नवीन जागेत स्थलांतर असा त्रिवेणी संगम झाला आहे. इन्स्टिट्यूटच्या सेंट्रल कौन्सिल ते चॅप्टर ऑफिसपर्यंत ५ हजार सदस्य आहेत. आम्ही या मॅनेजमेंट टीमचे सदस्य आहोत, याचा अभिमान वाटतो. १९४८ पासून ७५ वर्षे जगातील सर्वांत मोठी अकौंटिंग बॉडी म्हणून गणना होणे हा प्रवास कौतुकास्पद आहे. याकरिता इन्स्टिट्यूटचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. २०१७ पासून रत्नागिरीत शाखा सुरू असून सातवे वर्ष सुरू आहे. इन्स्टिट्यूटच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात रत्नागिरी शाखा भव्य आणि स्वयंपूर्ण होईल, अशा शुभेच्छा देतो. पुढील आठवड्यात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत.
सीए इन्स्टिट्यूटच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरवात आहे. यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, असे उपाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये यांनी सांगितले. माजी अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये यांनी सांगितले, विद्यार्थ्यांना यापूर्वी परीक्षेकरिता कोल्हापूर, पुणे, मुंबईत जावे लागत होते, शाखा सुरू झाल्यामुळे या सर्व परीक्षा येथेच होऊ लागल्या आहेत. रत्नागिरी शाखा उपक्रमशील आहे. रत्नागिरीतही सीएंची संख्या वाढत आहे.
यावेळी कोषाध्यक्ष सीए अक्षय जोशी, विकासा अध्यक्ष सीए केदार करंबेळकर आणि माजी अध्यक्ष सीए प्रसाद आचरेकर, माजी अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये, माजी अध्यक्ष सीए बिपिन शाह, माजी अध्यक्ष सीए अॅंथनी राजशेखर आदींसह शहरातील सीए उपस्थित होते. सूत्रसंचालन सीए केदार करंबेळकर यांनी केले.