खेड/प्रतिनिधी:- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी चार महिन्यांपूर्वीच स्वगृही परतत ठाकरे गटाच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे खेड तालुक्यातील राष्ट्रवादी खिळखिळी झालेली असतानाच त्यात आता अजित पवारांच्या बंडाची भर पडल्याने घड्याळाची गती आणखीनच मंदावणार आहे.
या बंडामुळे विचित्र स्थिती निर्माण झाली असून, शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव नेमकी कोणती भूमिका घेतात? यावरच राष्ट्रवादीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. माजी आमदार संजय कदम यांच्यामुळे राष्ट्रवादीची ताकद कमालीची वाढली होती. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला यापूर्वी त्यांनीच सुरूंग लावत राष्ट्रवादी काँग्रेसला सुगीचे दिवस प्राप्त करून दिले होते.
वर्षभरापूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर तीनच महिन्यापूर्वी माजी आमदार संजय कदम ठाकरे गटाच्या शिवसेनेत डेरेदाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला छेद मिळाला. खेड तालुक्यात शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांची पकड कायम असून, तालुक्यातील शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील वाढतच असल्याने शिवसेना जोमातच आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेला शह देण्याचाही तितकाच प्रयत्न केला जात असल्याने राजकीय संघर्ष टीपेला पोहचला आहे.
अजित पवार यांच्या बंडामुळे आता नवी समीकरणे उदयास येणार असल्याने राजकीय वातावरणदेखील ढवळून निघणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी अजूनही ठोस भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.