पाण्यात पोहताना तीन वेळा झाला दंश
चिपळूण:- मित्रांसोबत चिपळुणातील कळवंडे धरणात पोहण्यासाठी आलेल्या मुंबई-घाटकोपर येथील एका व्यक्तीला पाण्यातच तीनवेळा सर्पदंश झाला. त्याचा उपचारादरम्यान डेरवण रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना 9 जुलै रोजी सायंकाळी घडली. संजय तुकाराम कापरट (46, घाटकोपर, मुंबई) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. मुंबई घाटकोपर येथून पाच मित्र दोन दिवसांपूर्वी पावसाळी सहलीसाठी संगमेश्वर परिसरातील आपल्या गावी आले. तेथे फिरून रविवार ते चिपळूण तालुक्यातील कळंवडे येथील धरणावर पोहण्यासाठी आले होते. दुपारी 3 वाजता ते कळवंडे धरणावर पोहण्यासाठी उतरले. याचवेळी त्याला सापाने पाण्यातच तीनवेळा दंश केला. सुरूवातीला ते त्याला समजले नाही. त्यानंतर त्याच्या अंगात विष चढू लागल्याने तो अस्वस्थ झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारासाठी वेळ लागणार असल्याने त्याला कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती खालावल्याने त्याला डेरवण येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. शवविश्चेदन केल्यावर तीनवेळा सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचे पार्थिव मुंबईला नेण्यात आले.