खेड/प्रतिनिधी:- खाजगी शिकवणीसाठी घरी गेलेल्या अल्पवयीन युवतीवर लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी स्वप्नील सुरेश माने ( रा. मौजे वाकवली- नवानगर, दापोली) यास येथील अतिरिक्त सत्र न्यायालय-1चे न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी मंगळवारी 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ही घटना 28 डिसेंबर 2017मध्ये घडली होती. सरकारी पक्षाच्यावतीने डॉ. मृणाल जाडकर यांनी काम पाहिले
पिडित अल्पवयीन युवती नराधमाच्या घरी खासगी शिकवणीसाठी गेली होती. ती क्लासमधून बाहेर पडून बाथरूममध्ये गेली असता त्याने पिडित युवतीचे तोंड दाबून तिच्यावर लैगिक अत्याचार केला. याप्रकरणी त्याच्याविरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
मंगळवारी खटल्याची सुनावणी झाली असता अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासमोर डॉ. मृणाल जाडकर यांनी युक्तीवाद केला. सबळ पुरावा व केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच 50 हजार रुपये दंडही ठोठावला असून दंड न भरल्यास आणखी एक वर्ष सश्रम कारावासाच्या शिक्षेचाही समावेश आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे 22 साक्षीदार तपासण्यात आले.