चिपळूण/प्रतिनिधी:- चिपळूण-पोफळी मार्गावरील रस्त्याची सुधारणा व डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल तीन कोटी ६२ लाख रुपये खर्च केले. दोन महिन्यात या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त भावना आहे.
बांधकाम विभागाने निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
गुहागर-विजापूर मार्गावर चिपळूण ते पोफळी या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. २० किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकवस्ती आहे. त्यामुळे दळणवळणाच्यादृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे; मात्र या भागातील ग्रामस्थांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था असते.
मागील पावसाळ्यात ग्रामस्थांनी खड्ड्यांचा सामना केला. पावसाळा संपल्यानंतर काही ठिकाणचे खड्डे डांबरीकरणाने भरण्यात आले. त्यानंतर चांगल्या रस्त्यावर पुन्हा सुधारणेच्या नावाखाली तब्बल ३ कोटी ६२ लाख रुपये खर्च करण्यात आले. हा निधी खर्च करत असताना ज्या ठिकाणी खरोखरच डांबरीकरण करणे गरजेचे होते आणि रस्त्याची सुधारणा व्हायला हवी होती त्या ठिकाणी मात्र सार्वजनिक विभागाने दुर्लक्ष केले आहे.
Chiplun Politics : कोकणातला बडा नेता शरद पवारांची साथ सोडणार? कदम-सामंत भेटीने चर्चेला उधाण
त्यामुळे याही पावसाळ्यात नागरिकांच्या नशिबी खड्डे आले आहेत. मुंढे येथे कृषी विभागाच्या नर्सरीसमोर रस्त्यावर खड्डे पडायला सुरवात झाली आहे. या ठिकाणी गटाराचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे रस्त्यावर वारंवार खड्डे पडत आहेत.
अशीच अवस्था पोफळी येथील वैतरणा नदीच्या पुलावर निर्माण झाली आहे. नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळेच प्रामुख्याने रस्त्यावर खड्डे पडत आहेत. त्यामुळे रस्त्याची सुधारणा करताना किमान गटाराच्या पाण्याचा निचरा व्हावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून केली जात आहे. शिरगाव प्राथमिक आरोग्यकेंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचे दोन महिन्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. त्या ठिकाणी आता खड्डे पडायला सुरवात झाली आहे.