पाच जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर गावात सुमारे १४ वर्षांपूर्वी राजकीय वादातून रवींद्र उर्फ रवी मयेकर या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येचा वाद पुन्हा सोमेश्वर गावात उफाळून आला आहे. हत्येमध्ये शिक्षा झाल्याच्या रागातून रविवारी चौघांनी हत्या झालेल्या कै. रवी मयेकर यांच्या पुतण्याला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेला असतानाच सोमवारी दुपारी विरोधी गटातील पाच जणांनी दीपक उर्फ बाब्या मयेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. लाट्या काट्यांसह लोखंडी सळ्यांनी बेदम मारहाण करून बाब्या मयेकर यांचे डोके फोडले आहे. त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मारहाण करणाऱ्या पाच जणांना विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलीस स्थानकात सुरू होते.
सन 2009 मध्ये रत्नागिरीतील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सोमेश्वर मयेकरवाडी येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा वाद झाला होता. या वादातून त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे काम करणारे रवींद्र उर्फ रवी मयेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर गावातील वातावरण तप्त झाले होते. कै. रवी मयेकर यांची हत्या करणाऱ्या रुपेश मयेकर यांच्यासह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये रुपेश मयेकर याला शिक्षा झाली होती.
हत्येमुळे झालेल्या शिक्षेचा राग मनात ठेवून रविवारी सायंकाळी सात वाजता सुमारास कै. रवी मयेकर यांचा पुतण्या सुरज मयेकर हा गावातील ग्रामपंचायत समोर असलेल्या पानपट्टी जवळ उभा असता रुपेश मयेकर याने त्याला काकाच्या खुनाच्या आरोपात झालेल्या शिक्षेचा राग मनात ठेवून त्याच्यासोबत असलेल्या वीरेंद्र शिंदे, संदीप कदम या दोघांच्या मदतीने सुरजला बेदम मारहाण केली होती. . त्यानंतर सुरजने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी रुपेश मयेकर, वीरेंद्र शिंदे, संदीप कदम यांच्या विरोधात भादविक 324, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. परंतु याच वादाचे पर्यावरण सोमवारी राड्यात झाले.
सुरज मयेकर मारहाण प्रकरणामुळे विरोधी गटातील पाच जणांनी दीपक उर्फ बाब्या मयेकर यांना लाट्या-काठ्यासह लोखंडी सळीने बेदम मारहाण करत त्यांचे डोके फोडले. त्यांच्या डोक्याला झालेला गंभीर दुखापतीनेमुळे त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दीपक उर्फ बाब्या मयेकर यांच्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात भादंविक ३०७ नुसार हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलीस स्थानकात सुरू होतेसोमेश्वर गावातील राड्याची माहिती मिळतात सोमवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी, ग्रामीण पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलिस अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक डॉ. समाधान पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. या दोन्हीही राड्यामुळे सोमेश्वर गावात तणावपूर्ण शांतता आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.