संगमेश्वर / प्रतिनिधी:- संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गेले तीन दिवसात तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. सोमवारी रात्री गोवा बनावटीची दारू घेऊन पळून जाणाऱ्या सर्वेश भास्कर केरकर याला गाडीसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गोवा बनावटीच्या दारूसह तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना गोवा बाजूकडून चार चाकी वाहनांमध्ये अवैध दारू साठा घेऊन जात असल्याचे माहिती मिळाल्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली चंदू कांबळे , रामपुरे, सचिन कामेरकर, किशोर जोयशी, सचिन जाधव, आव्हाड यांनी महामार्गावर सापळा रचला. यावेळी पोलिसांना महामार्गावर हुंडाई आय 20 गाडीचा ( एम एच 47 ,ए 4655) संशय आल्याने थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ती गाडी कसबा फणसवणे अंत्रवली गावाकडून तांबेडी या गावाकडे रवाना झाली. तांबेडी गावचे पोलीस पाटील संतोष ब्रिद यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर गावातील ग्रामस्थ अजिंक्य ब्रीद , स्वप्निल ब्रीद, अर्थ ब्रीद , सुहास ब्रीद, मयूर लिंबकर, निलेश कुंभार यांच्या मदतीने पोलिसांनी सदरची गाडी पकडली. त्या गाडीमध्ये 12,548 गोवा बनावटीची दारूचे बॉक्स ,42,240 एकूण 32 बॉक्स, 15,840 रुपयाचे चार बॉक्स,19,800 बॉक्स दारू,4080 गोवा दारू आणि गाडी अशाप्रकारे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी सर्वेश भास्कर केरकर ( सावंतवाडी ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.