एक बूटाचा जोड व दोन पायमोजे
रत्नागिरी:- यावर्षी शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील 51 हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जात आहे. मात्र दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या सुमारे 75 हजार मुलांना मोफत गणवेशाचा लाभ मिळालेला नाही. पण राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन मोफत गणवेश देण्यास सरकारने मान्यता दिलेली आहे. तसेच त्या गणवेशासोबतच एक जोड बूट व दोन जोड पायमोजे देण्याचा निर्णय झाला आहे.
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेतून विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधील इ. 1 ली ते 8 वी च्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातींची सर्व मुले आणि दारिद्र्य रेषेखालील मुलांना मोफत गणवेशासाठी पात्र धरले जाते. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील 51 हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेशासाठी पात्र आहेत. नव्या शैक्षणिक वर्षांच्या प्रारंभी पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय झाला होता. पण दारिद्र्य रेषेवरील असलेले सुमारे 75 हजार विद्यार्थी या योजनेपासून बाजूला राहिले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना देखील मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळावा. तसेच मोफत गणवेश योजेनेंतर्गत सर्व पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे देण्यास शासन विचाराधिन होते. त्यानुसार राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन मोफत गणवेश देण्यास मान्यता दिलेली आहे. तसेच एक जोड बूट व दोन जोड पायमोजे देण्याचा निर्णय झाला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील सव्वा लाख विद्यार्थ्यांना मिळणार आहे.