चिपळूण:-तालुक्यातील शिरगाव येथील वाशिष्ठी नदीतील डोहात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बेपत्ता झाल्याची घटना रविवारी घडली होती. शोध मोहिमेनंतरही ते तरूण न सापडल्याने सोमवारी दिवसभर कोस्टल गार्डच्या पथकाकडून शोधकार्य सुरु होते. अखेर सायंकाळी डोहापासून काही अंतरावर त्या दोघांचे मृतदेह सापडले.
शहर परिसरातील आठ मुले दुचाकीने रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कुंभार्ली येथे फिरण्यासाठी गेले होते. यानंतर ते सर्वजण कुंभार्ली परिसरातील वाशिष्ठी नदीतील डोहात पोहण्यासाठी उतरले. त्याचेवळी पावसाची मोठी सर आल्यानंतर 8 जणांपैकी सहाजण लगतच असलेल्या एका झोपडीत जाऊन थांबले, तर आतिक बेबल व अब्दुल कादिर लसने हे दोघे या डोहात पोहत होते. हा डोह 15 ते 20 फूट खोल आहे. अशातच ते दोघेजण या डोहात गायब झाले. उर्वरित सहाजणांनी त्यांचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत.
या घटनेची माहिती परीसरातील ग्रामस्थांना दिल्यानंतर त्यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर त्या दोघांच्या शोधासाठी तत्काळ स्थानिकांच्या मदतीसह चिपळूण नगर परिषदेचे बचाव पथक व महाड येथील एसआरटी पथकाव्दारे शोध मोहीम सुरु करण्यात आली. तरीदेखील त्यांचा शोध न लागल्याने सोमवारी त्या तरुणांच्या शोधासाठी कोस्टल गार्डचे पथक दाखल झाले. या मोहिमेदरम्यान पत्यक्ष डोहात येणारा पाण्याचा पवाह जेसीबीव्दारे बदलण्याचा प्रयत्न केला जात होता. कोस्टल गार्डव्दारे या डोहात तरुणांचा चार तास शोध घेतला. सायंकाळी उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरु होते. मात्र ते दोघेजण सापडले नाहीत.
अखेर नागरिकांनी या डोह परिसरातील वाशिष्ठी नदीपात्रात त्यांचा शोध घेतला असता डोहापासून काही अंतरावर आतीक बेबल, अब्दुल लासने या दोघांचे मृतदेह सापडले.