औषध विक्रेत्याला 15 हजारांचा गंडा
रत्नागिरी:-सरकारी अधिकारी असल्याचे भासवून तुमच्या दुकानात अनियमितता आहे त्यामुळे 15 हजार रुपये द्या अन्यथा कारवाई करतो असे सांगत औषध विक्रेत्याकडून 15 हजार रुपये उकल्याची चर्चा सुरू आहे.
दक्षिण रत्नागिरी भागातील एका औषध विकेत्याच्या दुकानावर एका भामट्याने मी सरकारी अधिकारी आहे. तुमच्या दुकानाच्या इनस्पेक्शनसाठी आलो आहे. तुमच्या दुकानात काही त्रुटी आहेत. यामुळे कारवाई टाळायची असेल तर 15 हजार रुपये द्या असे सांगितले. यावेळी भांबावलेल्या त्या औषध विक्रेत्याने 15 हजार रुपये नाईलाजास्तव त्या व्यक्तीला दिले अशी चर्चा औषध विक्रेत्यांमध्ये सुरु आहे.
दरम्यान जिल्ह्यातील दापोली आणि लांजा तालुक्यातील काही औषध विक्रेत्यांना कॉल करण्यात आले. कॉलवर बोलणारी व्यक्ती म्हणते की, आपण मुंबईतून बोलत असून तुमच्या दुकानाच्या तपासणीसाठी स्पेशल स्क्वॉड आले आहे. आपल्यावर कारवाई नको असेल तर विशिष्ट रक्कम द्या असे सांगत औषध विक्रेत्यांकडे खंडणीची मागणी केली. असे गाऱ्हाणे अनेक औषध विक्रेत्यांनी सहायक आयुक्त यांच्याकडे मांडले.
सहायक आयुक्तांनी ही बाब पोलिस प्रशासनाच्या नजरेस आणली. अशा बनावट कॉल्स पासून सावध राहावे असे आवाहन औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.