भूस्खलन, ढगफुटी आणि विजांचे तांडव
नवी दिल्ली:- संपूर्ण उत्तर भारतात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस, भूस्खलन, डगफुटी आणि विज कोसळून आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झालाय.
मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशसह पर्वतीय राज्यांना बसला आहे.
मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात सर्वाधिक 11 मृत्यू झाले आहेत. याशिवाय उत्तरप्रदेशात 8, उत्तराखंडमध्ये 6, दिल्लीत 3, जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 2 जणांचा बळी गेलाय. डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनाने रस्त्यांचे ढिगाऱ्यात रुपांतर झाले आहे. तर राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांतील रस्ते पाण्यात बुडाले आहेत. गेल्या 24 जून रोजी हिमाचल प्रदेशात मान्सूनचे आगमन झाल्यापासून मोठा विध्वंस झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा मंडी आणि कुलू येथे ढगफुटीमुळे व्यास नदीत अचानक पाणी वाढले, त्यात तीन पूल, एक एटीएम आणि 4 दुकाने वाहून गेली.ढगफुटीनंतर व्यास नदीला अचानक आलेल्या पुरामुळे कुल्लू-मनालीमध्ये अनेक वाहने वाहून गेली. मनाली-लेह, चंदीगड-मनालीसह 5 राष्ट्रीय महामार्ग, भूस्खलनामुळे 736 रस्ते बंद झाले आहेत. हेरिटेज कालका-शिमला ट्रॅकवर मलबा पडल्याने गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
दिल्लीतील यमुना नदीचे पाणी धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचले आहे. रविवारी रात्री 9 वाजता जुन्या रेल्वे पुलावरील पाणी 203.62 मीटर उंचीवर होते, जे धोक्याच्या पातळीच्या 1.71 मीटर खाली होते. यमुनानगरच्या हथिनीकुंड बॅरेजमधून सतत पाणी सोडल्यामुळे दिल्ली सरकारने पुराचा इशारा जारी केला आहे. आतापर्यंत 1 लाख क्युसेकहून अधिक पाणी सोडण्यात आले आहे. दिल्लीत रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासांत 253 मिमी पाऊस झाला. यापूर्वी 25 जुलै 1982 रोजी झालेल्या 169.9 मिमी पावसानंतरचा हा उच्चांक आहे.
पंजाबच्या पटीयाला, फाजिल्का, होशियारपूर, फतेहगढ साहिबसह विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पटियालामध्ये पुराचा इशारा जारी करण्यात आला असून सखल भागातील घरे रिकामी करण्यात आली आहेत. तर चंदीगडमध्ये 24 तासांत 322 मिलीमीटर पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासोबतच हरियाणातील अंबाला, यमुनानगर, कुरुक्षेत्र, कर्नाल आणि कैथलसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. शनिवारपासून अंबालामध्ये 270 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे 175 हून अधिक रस्ते बंद झाले आहेत. गंगोत्री-यमुनोत्री महामार्ग रात्री 8 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. हवामान खात्याने राज्यात येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय.