ठाण्यातून आलेला तरुण कुटुंबासह फिरत होता संगमेश्वर परिसरात
संगमेश्वर / प्रतिनिधी:- पोलीस अधिकाऱ्याची गाडी असल्याचे भासवून टोयाटा क्वालिस गाडीवर दिवा लावून गाडीवर पोलीस अशी अक्षरे लिहून दिमाखात फिरणाऱ्या तोतयाला संगमेश्वर पोलिसांनी शिताफीने पकडले. सुशांत चंद्रकांत शिंदे (36, ठाणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तोतया संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवार ९ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, सुशांत शिंदे हा ठाणे येथून संगमेश्वर येथे टोयाटा क्वालिस गाडीने फिरत होता. आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगून गाडीवर दिवा लावून अनेकांची फसवणूक करत होता. याची खबर संगमेश्वर पोलिसांना मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांनी आपल्या टीमला संशयिताच्या मागावर पाठवले. पोलीस अमलदार कांबळे, म्हस्कर, बरगाले, आव्हाड, पंदेरे, खोंदल, कमेरकर, कुळ्ये, वाहन चालक आंब्रे यांनी संगमेश्वरात शोध सुरू केला. यावेळी सुशांत शिंदे हा टोयाटा क्वालिस (क्र.एम.एच.04 बी.क्यु.6789 ) हा पोलीस नसताना आपल्या नातेवाईकांसह एस. टी स्टँड परिसरात फिरताना आढळला. त्याचे ताब्यातील टोयाटो क्वॉलीस गाडीवर पोलीस दिवा लावुन तसेच गाडीचे आतील उजवे दर्शनी बाजुस पोलीस अशी अक्षरे असलेली पाटी कपटी उद्देशाने पोलिसांना दिसून आली. त्याची तपासणी केली असता ही गाडी संदिप संभाजी शिंदे या गृहविभाग, मंत्रालय, मुंबई येथील अधिकारी यांची आहे अशी बतावणी करू लागला. पोलिसांना संशय आल्याने तोतयागिरी करणाऱ्या सुशांतला ताब्यात घेतले. त्याच्यावर भादवीकलम 170, 171 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास मपोहेकाँ/564 कोष्टी करीत आहेत.
पोलिसांचे आवाहन
अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या आणि तोतयागिरी करणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच अशाप्रकारची फसवणूक करणारी व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.