मंडणगड:-केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंडगणगड महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
जालगाव (ता. दापोली) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या मंडणगड येथील मंडणगड आणि कुंबळे येथील कनिष्ठ महाविद्यालयांना पद्मश्री कर्मवीर भि.रा.तथा दादा इदाते यांचे नाव देण्यात आले. त्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कराड उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, लोकनेते गोपीनाथजी मुंडे व पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावली आहे. ही दोन्ही नावे लाभलेल्या महाविद्यालायातील विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाचा नावलौकिक नक्कीच वाढवतील.
यावेळी त्यांनी आपल्या खासदार निधीतून महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी लाखांची मदत जाहीर केली. सामाजिक कार्यकर्ते महेश गणवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्षा संपदा पारकर, उद्योजक ऋषी भटनागर, अवधूत चव्हाण, प्राचार्य राहुल जाधव उपस्थित होते. संत भगवानबाबा मित्र मंडळ आणि मंडणगड तालुका भाजपच्या वतीने डॉ. भागवत कराड यांचा सत्कार करण्यात आला.