गुहागर:- महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. जनतेचा विकास दूर मात्र स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलून आपली राजकीय पोळी भाजली जात आहे.
ही भावना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक सही संतापाची. असा एक उपक्रम तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला आहे.
श्री. हळदणकर यांनी सूत्रे हाती घेतल्यावर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना हात घालून ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी अंजनवेल येथील कोकण एलएनजी कंपनीचे समुद्रातील ब्रेक वॉटरचे काम करणाऱ्या एलअँडटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना पूर्वसूचना न देता तडकाफडकी कामावरून काढून टाकल्याचा मुद्दा हाती घेत कंपनी व्यवस्थापनाला जाब विचारून कामगारांचा प्रश्न सोडविला.
आता एक सही संतापाची हा उपक्रम तालुक्यात सुरू करण्यात आला आहे. सध्याचे राज्यातील राजकारण लोकशाहीच्या विरुद्ध दिशेने जात आहे. पक्षांतर करणे, गट स्थापन करणे, सरकारला पाठिंबा देणे असे राजकीय प्रकार सुरू आहेत. या राजकीय खेळात सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे राजकारण्यांचे दुर्लक्ष होत आहे. हे राजकारण सर्वसामान्यांना समजावे, त्यांच्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून द्यावी, आपली मते मांडावीत यासाठी एक सही संतापाची हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे श्री. हळदणकर यांनी सांगितले.
मनसेचे संपर्क प्रमुख प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही मोहीम राबवत आहेत. दरम्यान येत्या १२ जुलै रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने मनसे पदाधिकाऱ्यांकडून स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे, असे हळदणकर यांनी सांगितले.