रत्नागिरी:- तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कळझोंडी शाळा क्र. २ येथील दोन नवीन वर्गखोल्यांचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
यावेळी श्री.सामंत म्हणाले, गावातील विकासकामे करताना एकमेकांमधील मतभेद दूर ठेवून ग्रामविकासाकरिता एकत्र यावे. ती काळाची गरज आहे. सर्व विकासकामे करण्याची जबाबदारी आपली असून कळझोंडीमधील एकही विकासकाम प्रलंबित राहणार नाही. कळझोंडीसारख्या छोट्या गावाच्या विकासासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. गावातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी महिला बचत गटांसाठी वाटद येथे विक्री केंद्र उभारण्यात येणार असून या विक्री केंद्राचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. गावात जागा उपलब्ध करून दिल्यास व्यायामशाळा उभारण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी माजी सभापती मेघना पाष्टे, सरपंच दीप्ती कीर, तुषार साळवी व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी गडनरळ, कोळिसरे, वैद्यलावगण येथील विविध विकासकामांचे भूमिपूजनही केले. या गावांच्या विकासासाठी २ कोटी ५० लाखाचा निधी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. सामंत यांनी या दौऱ्यादरम्यान खालगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथे बांधण्यात येणाऱ्या बचत गट इमारतीच्या जागेची पाहणी केली. बांधकामासाठी वीस लाख रुपये निधी देणार असल्याची घोषणा केली.