डांबरीकरणावरून वाहतूक सुरू झाल्याने मातीवरून वाहने घसरून अपघाताची शक्यता
रत्नागिरी:- मुंबई – गोवा महामार्गावर काँक्रिटकरणाचे काम करताना ठेकेदाराने योग्यती काळजी न घेतल्यामुळे दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
वांद्री,मानसकोंड दरम्यान काँक्रिटकरणावरून वाहने धावत आहेत. चौपदरीकरणदरम्यान संपूर्ण कटिंग धोकादायक रित्या तोडण्यात आले होते. कोठेही संरक्षक भिंती बांधण्यात आलेल्या नाहीत. परिणामी रस्ता वाहतूक सुरू असताना अचानक माती कोसळून मोठा अपघात होण्याची भीती आहे.
मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर आल्यामुळे पुन्हा जुन्या रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. या मातीतून वाहन हाकताना वाहने घसरून तिथेही अपघात होण्याची शक्यता आहे. ठेकेदाराच्या ढिसाळ कारभाराचा वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच 15-20 दिवसापूर्वी करण्यात आलेलं डांबरीकरण आता पूर्णपणे उखडून निघत आहे. वाहने जावून खडी एकत्र जमून मोठ मोठे खड्डे महामार्गावर पडत आहेत. वाहन चालकांना कंबरेला हादरे बसत आहेत. प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याच ना ठेकेदाराला सोयर सुतक ना लोकप्रतिनिधींना. अशाप्रकारचे निकृष्ट डांबरीकरण करून जनतेची फसवणूक करण्यात येत आहे. न्यायालयाने महामार्ग विभागाला दंड ठोठावूनही कोणताच परिणाम झालेला दिसून येत नाही. आतातरी जनता अशा भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवेल का?