वार्ताहर पाली/पाली येथील डी.जे.सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल या प्रशालेमध्ये आज “ग्रीन डे” साजरा करण्यात आला. यादिवसाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. नूतन कांबळे मॅडम, सहकारी शिक्षकवृंद आणि विद्यार्थीवर्गाच्या हस्ते प्रशालेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
या पावसाळ्यामध्ये एक तरी वृक्ष लावू आणि त्याची काळजी घेऊ याबाबतची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. यानंतर “ग्रीन डे” ला अनुसरून वर्गसजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थी आपला वर्ग सजविण्यामध्ये तल्लीन झाला होता. विषयाला अनुरूप अशा वर्गसजावटीच्या नवीन कल्पनांनी विद्यार्थ्यांनी शिक्षक वर्गाला भारावून टाकले. सदरच्या स्पर्धेचे परीक्षण प्रशालेच्या सहशिक्षिका श्रीम. जोस्त्ना पांचाळ मॅडम, श्रीम.साक्षी सावंत मॅडम, श्रीम.मैथिली बेंडके मॅडम, श्रीम.ऋतुजा महाकाळ मॅडम, श्री.गुरव सर यांनी केले.

यामधून सर्वोत्तम अशा वर्गसजावटीला विजेता घोषित करण्यात आले. सर्वच विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन वर्गसजावट केली होती.या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व, वनस्पतींची आवश्यकता, वृक्षांचे जतन, आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांची आवश्यकता आणि महत्त्व याबाबत प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीम. नूतन कांबळे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशालेच्या सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीवर्ग यांनी विशेष मेहनत घेतली. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. नूतन कांबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.