खेड:- महाराष्ट्र कामगार क्रांती सेना संघटनेमार्फत शासनाकडून संघटनाच्या माफक फीमध्ये शिलाई मशिनसह घरघंटी, घरकुल मिळवून देतो, असे सांगून 839 महिलांची तब्बल 21 लाख 18 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी युवाध्यक्ष संदीप शंकर डोंगरे याच्यावर खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 10 सप्टेंबर 2022 ते आजपर्यंत हेदली येथे घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, संदीप डोंगरे याने महाराष्ट्र कामगार क्रांती सेना या संघटनेचा युवाध्यक्ष असल्याचे सांगत महिलांचे वेळोवेळी जाहीर कार्यक्रम घेतले. या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र कामगार क्रांती सेना संघटनेमार्फत शासनाकडून संघटनाच्या माफक फी मध्ये शिलाई मशिन, घरघंटी, घरकुल मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्या पोटी ठराविक रक्कम स्वीकारली. तालुक्यातील तब्बल 839 महिलांकडून शिलाई मशिन, घरघंटी, घरकुलासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रेही घेतली. मात्र दीड वर्षाचा कालावधी लोटूनही एकाही महिलेला शिलाई मशिन, घरघंटी, घरकुल प्राप्त झालेल नाही. या बाबत सातत्याने महिलांनी विचारणा केल्यानंतर उडवाउडवाची उत्तरे दिली. तालुक्यातील 839 महिलांची 21 लाख 18 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलांनी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार संदीप डोंगरेवर 7 जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.