रत्नागिरी:- महाविद्यालयीन वयापासूनच उद्याच्या नागरिकांना ग्राहक चळवळीची माहिती व्हावी, यासाठी ग्राहक पंचायतीची महाविद्यालयीन शाखा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेने घेतला आहे.
महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची मासिक बैठक अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. रत्नागिरी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये ग्राहक पंचायतीचे कार्य विस्तारित करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीत झाली. उद्याचे नागरिक घडणार असलेल्या महाविद्यालयांमध्ये ग्राहक चळवळीविषयी माहिती दिली गेली, तर त्याचा अधिक परिणाम साधला जाऊ शकेल, हे लक्षात घेऊन महाविद्यालयांमध्ये संपूर्ण कार्यकारिणीसह ग्राहक पंचायतीची शाखा सुरू करावी, असा विचार बैठकीत झाला. त्यानुसार लवकरच विविध महाविद्यालयांशी संपर्क साधण्यात येणार आहे.
जळगाव येथे पुढील महिन्यात होणार असलेल्या राज्य अधिवेशनासंबंधी बैठकीत चर्चा झाली. शाखेचे प्रसिद्धीप्रमुख पत्रकार प्रमोद कोनकर यांना अलीकडेच देवर्षी नारद पुरस्कार मुंबईत प्रदान करण्यात आला होता. त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
बैठकीला सचिव आशीष भालेकर, सहसंघटक उमेश आंबर्डेकर, सहसचिव श्रेया साळवी, तसेच दिलीप कांबळे, दीपक साळवी आणि मीनल कोकाटे हे सदस्य उपस्थित होते.