दापोली / प्रतिनिधी:- दापोली शहरातील टांगर गल्ली येथे एका रहिवासी इमारतीवर लगतचा मातीचा डोंगर कोसळल्याने इमारतीतील सदनिकेचे प्रचंड नुकसान झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दापोली शहरातील टांगर गल्ली येथे एस. एम. हार्मोनी नावाची रहिवासी इमारत आहे. ही इमारत बांधताना बांधकाम व्यावसायिकाने उभा डोंगर कापून इमारतीकरता जागा करून ही इमारत बांधली आहे. या इमारती लगतचा मातीचा डोंगर कोसळून नये याकरिता बांधकाम व्यावसायिकाने केवळ चिऱ्याची भिंत उभी केली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या धुवांधार पावसाने येथील माती सैल होऊन ही भिंत मातीसह कोसळली. यामुळे इमारतीमधील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या रेहाना शेख यांच्या बेडरूमच्या भिंतीवर ही भिंत कोसळून भिंतीतील चिरे व बिम थेट बेडरूम मध्ये येऊन पडला. रेहाना या दोन सेकंदापूर्वीच बेडरूम मधून बाहेर आल्याने त्या थोडक्यात बचावल्या. मात्र या घटनेमध्ये रेहाना शेख यांचे सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.