दापोली:- हर्णै गावाला पाणी पुरवठा करणारा अडखळ हद्दीतील खेम धरण पाण्याने तुडूंब भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. एवढे ते तुडूंब भरले आहे. त्यामुळे हर्णे ग्रामस्थांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
रत्नागिरी जिल्हयात मासेमारीसाठी सुप्रसिध्द असलेल्या हर्णै बंदर गावासह जिल्हयात सर्वाधिक मच्छिमारी समाज बांधवांची वस्ती असलेल्या पाजपंढरी या गावांसह पाळंदे आणि अडखळ या गावांची तहान भागवणारूया खेम धरणाच्या बांधकामास 1971 मध्ये सुरूवात करण्यात आली. ते साधारणपणे 1974 मध्ये बांधुन पूर्णत्वास गेले तद्नंतर 1985 मध्ये या धरणाच्या देखभाल दुरूस्तीसाठी हर्णै ग्राम पंचायतीकडे धरणाचे हस्तांतर करण्यात आले. खेम धरणाचा कॅचमेट एरिया 0.90 स्केअर मैल पाण्याने व्यापला असून खेम धरणाच्या पाणी साठयाची क्षमता 36 कोटी 45 लाख लिटर म्हणजेच 13.50 एमसीएफटी आहे. मच्छिमारीसाठी ख्याती असलेल्या हर्णै गावात स्थानिकांसह व्यापारासाठी आलेल्यांची झपाटयाने वाढत चाललेली लोकसंख्या लक्षात घेता धरणाची उभारणी करते वेळी गृहीत धरलेली तेव्हाची दरडोई लोकसंख्या आणि सद्यस्थितीतील लोकसंख्या यात खुपच मोठा फरक असल्याने त्याचप्रमाणे वातावरणातील सततच्या बदलत्या मौसमी पावसाने हर्णै पंचका्रेशीला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
खेम धरणातून आता फक्त हर्णे, पाळंदे आणि अडखळची खेम वाडी यांनाच पाणी पुरवठा धरणातून केला जातो. अशा या धरणाच्या भिंतीला भगदाड पडून धरणातून पाणी गळती सुरू झाली होती. धरण दुरूस्तीसाठी आले होते मात्र कोणीच काही लक्ष देत नव्हते म्हणून धरणाखालील अडखळ, इरफानिया मोहल्ला,आंजर्ले, मुर्डी गावाला मोठा धोका निर्माण झाला होता. प्रसार माध्यामांनी आवाज उठवल्यामुळे तत्कालीन युती शासनाने याची दखल घेत त्यावेळी दुरूस्तीसाठी 2 कोटी 45 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे धरण दुरूस्तीचे काम मार्गी लागले. आज तेच धरण पाण्याने तुंडूब भरले असून दरवर्षीप्रमाणे जानेवारीपर्यंत हर्णे गावाला पाणी पुरवठा करण्यास कोणतीच अडचण येणार नाही.