रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हयाचा विकास आराखडा बनविताना संबंधित यंत्रणांनी जिल्हयातील शक्ती स्थानांचा, कच्च्या दुव्यांचा उहापोह करावा, जेणेकरुन तयार झालेला विकास आराखडा हा संपूर्ण महाराष्ट्राला पथदर्शी ठरावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केली.
जिल्हा विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने, जिल्हयातील प्रमुख विभागप्रमुखांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळये, विभागीय वनअधिकारी दिपक खाडे, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी,सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रत्नागिरी इनुजा शेख उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे.
यासाठी जिल्हयातील सर्व यंत्रणांनी आपले योगदान द्यावे. जिल्हयातील बलस्थाने, संधी, कमतरता/उणीवा आणि धोके विचारात घेवून संबंधित यंत्रणांनी तो आराखडा परिपूर्ण बनवावा असे निर्देश देवून या आढावा बैठकीत कृषी अधिक्षक, कृषी कार्यालयाने सादर केलेल्या आराखडयाचे कौतुक करुन सर्व विभागांनी याप्रमाणे आपआपल्या विभागाचा आराखडा बनवावा अशी सूचना केली. या आढावा बैठकीसाठी सुमारे 50 हून अधिक विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.