प्रवाशांना कोकणचे निसर्गसौंदर्य पाहता येणार
मुंबई:- मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते सिंधुदुर्ग या कोकण ग्रीन फिल्ड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनास अंतिम मान्यता मिळाली. सुमारे ३८८ किलोमीटरच्या या महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून काम करणार आहे.
कोकण द्रुतगती महामार्ग झाल्यानंतर मुंबईसाठी सर्वात गतिमान महामार्ग तयार होईल. हा महामार्ग नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाईल. त्यामुळे कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास करणे सोयीचे होईल. कोकण द्रुतगती महामार्ग हा रायगड जिह्यातील पेण, अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा तसेच रत्नागिरी जिह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी असा जाणार आहे.
हा महामार्ग पेण जिह्यातल्या बलवली गावातून सुरू होईल. रायगड जिह्यातील पेण ते रत्नागिरी हा महामार्ग 94.40 किलोमीटर, रायगड रत्नागिरी जिल्हा ते गुहागर चिपळूणपर्यंत 69.39 किलोमीटर, पुढे गुहागर, चिपळूण ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा असा 122.81 किलोमीटर आणि सिंधुदुर्ग. जिल्हा ते पत्रादेवी असा 100.84 किलोमीटर असा एकूण 388.45 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या प्रकल्पासाठी अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या मार्गाची आखणी कोकणपट्टीच्या किनाऱ्याजवळून करण्यात येणार असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोकणचे निसर्गसौंदर्य पाहता येईल, असा दावा या ग्रीन फिल्ड महामार्गाची घोषणा करताना करण्यात आली होती.
हा महामार्ग चार टप्प्यांत पूर्ण केला जाईल. पेण ते रत्नागिरी ९४ किमी, रत्नागिरी ते गुहागर, चिपळूण ७० किमी, गुहागर, चिपळूण ते राजापूर १२२ किमी आणि सिंधुदुर्ग जिल्हा ते पत्रा देवी असा १०१ किमी असा एकूण ३८८ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल. समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात लक्षात घेऊन या महामार्गावरील वेगमर्यादा ताशी १०० किलोमीटर अशी ठेवण्यात येणार आहे.
असा असेल कोकण Greenfield Expressway
■ रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे आणि १८ तालुक्यांतून जाणार.
■ लांबी : ३८८ किमी, सहापदरी.
■ पेण तालुक्यातील बलवली गावातून सुरू होणार
■ नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणार.
■ वेगमर्यादा : ताशी १०० किमी.
पर्यटन व औद्योगिक विकासात भर
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून कोकण विभाग हा पर्यटन, औद्योगिक व वाणिज्य कामांसाठी समृद्ध आहे.
गोवा तसेच कोकणातून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या पर्यटकांची, नागरिकांची मोठी संख्या आहे.
हा महामार्ग झाल्यानंतर कोकणातील दळणवळण गतिमान होऊन पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.
सोबतच औद्योगिक वाढीलाही चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.