खेड:-येथील सन्मित्रनगर डाकबंगला येथे उभी करून ठेवलेली टाटा मॅजिक गाडीला शॉर्ट सर्किटने अचानक लागलेल्या आगीत गाडी जळून खाक झाली. सुदैवाने गाडीत कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे की, सातेरे जामगे येथील मेटकर हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी खेड येथे गेले होते. त्यांनी गाडी घराशेजारी रस्त्यावर उभी करून ठेवली होती. मात्र थोड्या वेळातच गाडीला आग लागली. ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. खेड नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती.