युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह यांच्या पाठपुराव्याला यश
चिपळूण (ओंकार रेळेकर) : चिपळूण-गुहागर मार्गावर उक्ताड बायपास येथे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने नागरिक तसेच युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी तीव्र संताप व्यक्त करत खड्डा भरो आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. अखेर सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिपळूण येथील अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेत या रस्त्यावरील खड्डे जांभा दगड व मकिंगने भरण्याचे काम सुरू केले आहे.
उक्ताड बायपास रस्त्याच्या दुरूस्तीचे काम गेले एक ते दीड वर्ष करण्यात आले नव्हते. सध्या या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात तर मार्गावरून गाडी चालविताना कसरत करावी लागत आहे. तसेच पादचाऱ्यांना खड्ड्यात पाणी भरल्याने संरक्षक भिंतीच्या कड्यावरून चालत जावे लागत आहे. अशावेळी एखादे वाहन गेल्यास चिखलयुक्त पाणी पादचाऱ्याच्या अंगावर उडत आहे. युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी याची गंभीर दखल घेत बुधवार दि. ५ रोजी खड्ड्यात जमा झालेले पाणी बादलीत भरून सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिपळूण यांच्या कार्यालय गाठले व तेथील अधिकाऱ्यांना खड्डे तात्काळ भरा अन्यथा खड्डा भरो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूणचे कार्यकारी अभियंता अमरजीत रामशे यांच्याकडे याबाबत संपर्क साधला असता हा रस्ता आपल्या अखत्यारीत येत नसून तुम्ही नगरपालिका मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याशी चर्चा करून माहिती घ्या असे सांगितले. त्यानंतर मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याशी चर्चा केली असता सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिपळून यांच्याकडे वर्ग केला आहे असे सांगण्यात आले. अखेर श्री.सरगुरोह व युवकांनी चिपळूण सार्वजनिक बांधकाम उपविभागचे अधिकारी जे. एम. पटेल यांची भेट घेतली. श्री. पटेल यांनी शाखा अभियंता श्री. नलावडे यांनी तात्काळ बोलावून रस्त्याबाबतची माहिती घेतली व पुढील आठ दिवसात खड्डा भरण्याचे आश्वासन दिले. मात्र, सोशल मीडियावरन व्हिडिओ व्हायरल होत असल्याने तात्काळ दखल घेत गुरूवारी या रस्त्यावरील खड्डे जांभ्याची कच व मकिंग टाकून बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले. श्री. सरगुरोह यांनी या कामी जातीनिशी लक्ष घातल्यानेच हे काम मार्गी लागले असून पंचक्रोशीतील नागरिकांनी श्री.सरगुरोह यांचे आभार मानले आहेत.