रत्नागिरी:- खरीप हंगामाला आवश्यक असा पाऊस जिल्ह्यात पडत आहे. त्यामुळे खरीप हंगामाची कामे वेगाने सुरू आहेत. जिल्हा कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ६८ हजार ८५ हेक्टरपैकी १ हजार ४३१.६५ हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे.
तर १० हजार ४३५ हेक्टरपैकी ७७३.७७ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.
जूनमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात मोसमी पावसाचे आगमन लांबल्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामावर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना पेरण्या, लावण्यांचे वेळापत्रक बदलावे लागले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये थांबूनथांबून सरी पडत आहेत.
पावसाच्या आगमनाने भात रोपांना संजीवनी
त्यामुळे नांगरणीसह लागवडीसाठीची तयारी करणे सोपे झाले आहे. अति पावसामुळे मळ्यात पाणी राहिले तर रोपे व्यवस्थित चिखलामध्ये लावली जात नाहीत. सध्या चिखल करण्यासाठी पाहिजे तेवढा पाऊस सर्वत्र पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे.
भात शेतीचे वेळापत्रक १५ दिवसांनी पुढे गेले
६८ हजार ८५ हेक्टर भात क्षेत्रासाठी ६ हजार २१२ हेक्टरवर रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. त्यातील १ हजार ४३१ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवडही पूर्ण झाली आहे. या रोपांना जगविण्यासाठी पाणी मिळत असल्याने रुजवात चांगली होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भातशेतीबरोबरच नाचणी शेतीलाही हा पाऊस पूरक ठरला आहे. त्यामुळे शेतकरी नाचणीकडे वळत आहेत. नाचणी पेरणी संगमेश्वर तालुक्यात ७०.३१ हेक्टरवर झाली आहे.
बुधवारी सरासरी २७.४४ मिमी पाऊस
दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी २७.४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड ८ मिमी, दापोली ६३ मिमी, खेड १४ मिमी, गुहागर २२ मिमी, चिपळूण १३ मिमी, संगमेश्वर २४ मिमी, रत्नागिरी ४४ मिमी, राजापूर ५० मिमी, तर लांजा येथे ९ मिलिमीटर पाऊस पडला आहे.