संगमेश्वर:- फ्रान्स अभ्यासक जॅकोमो बुरज्वा हे सध्या संगमेश्वर तालुक्यात असून ते ग्रामीण जीवनाचा अभ्यास करत आहेत. या दौऱ्यात त्यांनी संगमेश्वरच्या कला दालनाला भेट दिली.
जॅकोमो बुरज्वा यांनी एम इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचे शिक्षण त्यांनी घेतले असून त्यांना ५ भाषा अवगत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे धडे देऊन ग्रामीण जीवनाचा अभ्यास ते करीत आहेत. बुरंबी पंचकोशी शिक्षण संस्थेचे सचिव शरद बाईत आणि राजाराम गर्दे यांना विनंती करून दादासाहेब सरफरे विद्यालयातील इंग्रजी शिक्षक जाधव यांच्यासह जॅकोमो यांना संगमेश्वरच्या पैसा फंड हायस्कूलचे कलादालन पाहायला पाठविण्याची विनंती कला विभागाने केली होती. त्यानुसार जॅकोमो यांनी कलादालनाला भेट दिली.
कलाकृती अनुकरण करून करता येत नाही. चित्र म्हणजे कलाकाराच्या अंतर्मनाचे एक प्रतिबिंब असते. मी कलाकार नाही, मात्र कलाकृती कशी पाहावी, याची दृष्टी माझ्याकडे आहे. पैसा फंड कलादालनातील कलाकृती पाहून माझे मन आपोआप चिंतनात गेले. कलाकारांनी आपल्या कलाकृतीतून मांडलेल्या भावना उत्कट आहेत. म्हणूनच त्या पाहणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधतात, असे बुरज्वा यांनी यावेळी सांगितले. व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांनी जॅकोमो यांचे स्वागत केले. चित्रकार विष्णू परीट यांनी रेखाटलेली एक कलाकृती त्यांना भेट दिली.