स्मिता कुरूसकर या महिलेच्या खूनाचा आरोप
संगमेश्वर:- तालुक्यातील माभळे येथे मुंबई येथील स्मिता कुरूसकर यांचा खून केल्याचा आरोप असलेल्या संशयिताचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.श्रीकांत टोलू घडशी असे आरोपीचे नाव आहे.पैशाच्या हव्यासातून स्मिता यांचा दगडाने ठेचून खून केल्याचा आरोप घडशी याच्यावर ठेवण्यात आला आहे. मागील काही वर्षापासून जेलमध्ये असलेल्या घडशी याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.न्यायालयाने घडशी याचा जामीन अर्ज नामंजूर केला.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल अंबालकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिला. खूनाचा आरोप असलेला मुख्य आरोपी श्रीकांत घडशी हा 2018 पासून जेलमध्ये आहे. मधल्या काळात कोरोना साथीच्या आजारामुळे 9 जुलै 2020 ते 23 मे 2022 या काळात जेलमधून बाहेर सोडण्यात आले होते. तर 23 मे 2022 नंतर पुन्हा तो जेलमध्ये नियमानुसार हजर झाला होता. या काळात आपण कोणताही गुन्हा केला नाही. आपण कुटुंबात कमविणारे एकटेच असून आपली आई देखील आजारी असते.त्यामुळे आपल्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी घडशी याच्यावतीने न्यायालयापुढे करण्यात आली होती.घडशी याच्या जामीन अर्जाला विरोध करताना सरकारी वकिलांनी सांगितले की, घडशी याने अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. या गुह्यासाठी त्याला फाशी अथवा जन्मठेपेची शिक्षा होवू शकते.
घडशी हा स्मिता कुरूसकर यांच्या खूनातील मुख्य आरोपी आह़े त्याला जामीनावर मुक्त केल्यास तो पळूण जाण्याची शक्यता आहे. तसेच तक्रारदार व साक्षिदार यांना तो धमकावू शकतो. असे न्यायालयापुढे नोंदवित जामीन अर्जाचा विरोध केला.
न्यायालयाने आपल्या निकालात नोंदविले की,घडशी हा स्मिता कुरूसकर खून पकरणातील आरोपी कमांक एक आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबानुसार पिडीतेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला असल्याचे पोलिसांकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून दिसून येत आहे.मागील वेळी घडशी याचे मागील तीन जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळून लावण्यात आले होत़े आता अशी कोणतीही वेगळी परिस्थिती दिसून येत नाही ज्यासाठी जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा असे न्यायालयाने निकालात नोंदवले आहे. गुन्ह्यातील माहितीनुसार मुंबईतील स्मिता कुरूसकर यांना संगमेश्वर येथे जमीन विकत घ्यावयाची होती.घडशी याने जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून 25 लाख रूपयांचा व्यवहार स्मिता कुरूसकर यांच्याशी केला होता.घडशी याचा बनाव कुरूसकर यांच्या लक्षात आल्याने आपल्याला पैसे परत द्यावे लागतील अशी भिती घडशी याला होती. त्यानुसार स्मिता कुरूसकर यांचा काटा काढायचा असा कट घडशी याने केला.
त्यानुसार घडशी याने 11 जुलै 2018 रोजी स्मिता कुरूसकर यांना जमीन खरेदी करण्याच्या बहाण्याने संगमेश्वर येथे बोलावून घेतले होते.कुरूसकर या जमीन पाहण्यासाठी संगमेश्वर येथे आल्यानंतर आरोपी घडशी हा त्यांना माभळे येथील चिरेखाणीजवळ घेवून गेला. त्याठिकाणी कुरूसकर यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला व मृतदेह चिरेखाणीत पूरून ठेवला होता. दरम्यान स्मिता कुरूसकर या मुंबई येथून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पतीकडून मुंबई येथे दाखल करण्यात आली होती.स्मिता या संगमेश्वर रत्नागिरी येथे जमीन खरेदीसाठी गेल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले होत़े त्यानुसार रत्नागिरी पोलिसांनी याप्रकरणी तपास करताना जमीन व्यवहारासंबंधी कागदपत्रे हाती लागली होती.त्यानुसार या प्रकरणात श्रीकांत घडशी याचे नाव समोर आले होते.
पत्नीचाही खून केल्याचा घडशीवर होता आरोप
श्रीकांत घडशी याने यापुर्वी आपल्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होत़ा. मात्र त्यातून त्याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होत़ी. स्मिता कुरूसकर पकरणात घडशी याचे नाव समोर येताच त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिसांना त्याच्यावर संशय आल़ा. त्यानुसार त्याची कसून चौकशी केली असता त्याने खूनाची कबुली दिल़ी असे पोलिसांकडून सांगण्यात आले.