चिपळूण (ओंकार रेळेकर):- मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही, असे निर्लज्ज विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण केले. बेताल विधान करून देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर तात्काळ राष्ट्रद्रोहचा गुन्हा दाखल करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती कमिटी सरचिटणीस सुनीलभाऊ सावर्डेकर यांनी येथील पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यानुसार संभाजी भिडे यांनी संविधान नीट वाचावे, म्हणजे त्यांना कळेल की १५ ऑगस्टला भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नाही. तर सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्वातंत्र्याची ती नांदी होती. जे स्वातंत्र्य मनुस्मृतीने या देशातील बहुजन समाजाला पाच हजार वर्षांपासून नाकारले होते. भाजपा व संघ विचाराच्या लोकांना अखंड भारतावर तर बोलण्याचा अधिकारच नाही. शामाप्रसाद मुखर्जी यांनी अशा मुस्लीम लिग बरोबर युती केली होती. ज्यांनी १९४० मध्ये स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली होती. तशी मांडणी सावरकर यांनीही केली होती, म्हणजे खरा इतिहास आता समोर येत आहे. तुम्ही संविधान दिवस काळा दिवस म्हणून पाळणार ? १९४८ मध्ये तिरंगा पायदळी तुडवला, यातून लक्षात येते की, आपणांस स्वातंत्र्य व संविधान मान्य नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा मनुस्मृतीचेच समर्थक आहेत, असे या निवेदनात नमूद केले आहे.संपूर्ण बहुजन समाज व स्त्रीयांनी आपल्या पायाखाली राहिले पाहिजे, अशी यांची मानसिकता आहे, अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो व संभाजी भिडेंवर लवकरात लवकर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.यावेळी चिपळूण तालुका अनुसूचित जाती अध्यक्ष सूर्यकांत चिपळूणकर, खेड तालुका अनुसूचित जाती अध्यक्ष चंद्रकांत पेवेकर, संतोष देवळेकर, श्रीधर पालशेतकर, दिनेश सावर्डेकर, केतन पेवेकर, अनिल चिपळूणकर, अरविंद खेरटकर मधुकर सावर्डेकर आदी उपस्थित होते.