चिपळूण तालुका काँग्रेसची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
त्वरित कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
चिपळूण (ओंकार रेळेकर):- गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या जमीन मालकांना अद्याप मोबदला मिळालेला नाही.
हा मोबदला संबंधित जमीन मालकांना त्वरित द्या.अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल,असा इशारा चिपळूण तालुका काँग्रेसने दिला आहे.
यासंदर्भात चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना चिपळूण ताुलका काँग्रेसच्यावतीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे,की गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी रस्त्यालगतच्या अनेकांच्या जमीनींचे भूसंपादन शासनाकडून करण्यात आले आहे. या महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जागेपोटी योग्य मोबदला तातडीने अदा केला जाईल,असे आश्वासन काही महिन्यांपूर्वी शासनाकडून देण्यात आले होते.
या मोबदल्यापोटी सुमारे ४० कोटी रुपये सरकारकडून आपल्या विभागाकडे आलेले आहेत,अशी माहिती मिळते. मात्र संबंधित जमीन मालकांना अद्यापही त्यांच्या जागेचा मोबदला अदा करण्यात आलेला नाही.
त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. तरी संबंधित जमीन मालकांना भूसंपादनापोटी त्यांचा योग्य तो मोबदला तातडीने अदा करावा. यासंदर्भात येत्या १५ दिवसांत त्वरित कार्यवाही सुरू न केल्यास चिपळूण तालुका काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल,असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी प्रशांत यादव यांच्यासह चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष तथा चिपळूण शहर काँग्रेसचे अध्यक्ष लियाकत शाह,माजी नगरसेवक कबीर काद्री,माजी नगरसेविका सफा गोठे,महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्ष श्रद्धा कदम,सेवादलचे माजी जिल्हाध्यक्ष अ. ल. माळी, तालुका उपाध्यक्ष जनार्दन पवार,तालुका सचिव शमून घारे,अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, सेवादलचे तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश दाते, मनोज दळी,सौ.विणा जावकर, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन मोरे, रविना गुजर, जिल्हा सचिव मिलन गुरव, सेवादलच्या शहराध्यक्ष नंदा भालेकर, महिला काँग्रेसच्या तालुका सचिव पूर्वा आयरे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष टी. डी. पवार आदी उपस्थित होते.