रत्नागिरी:-जिल्ह्यातील नमन कलावंतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून नमन लोककला संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय नमन लोककला मंडळ रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आले आहे. शासनाकडून वृद्ध कलाकारांना मानधन मिळण्यासाठी असलेली 48 हजारापर्यंतची उत्पन्न मर्यादा वाढविण्यात यावी. त्याचबरोबर शासकीय मानधन मिळण्याचा नमन कलावंतांसाठी असलेला ‘क’ वर्गाचा दर्जा ‘ब’ वर्गात करून मिळावा यासाठी ठराव करण्यात आला आहे.
देवरुख येथे नमन लोककला मंडळ रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक बुधवारी जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत प्रथम मृत झालेल्या झालेल्या कलाकारांना संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नमन कलावंताच्या अभिनंदनाचे ठराव सदस्यांनी सूचित केल्याप्रमाणे घेण्यात आले. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त सचिव परशुराम मासये यांनी वाचून दाखवले. त्याला उपस्थित सर्व सदस्यांनी मंजुरी दिली.
संगमेश्वर तालुका मंडळ कार्यकारिणी आणि युत्युसू आर्ते यांनी सभेचे आयोजन केले होते. यावेळी आर्ते यांनी उपस्थितांना डायरी आणि पेन देत स्वागत केले. त्यानंतर मागील सभेत झालेल्या विषयांवर चर्चा झाली. नमन मंडळांना प्रयोग सादर करताना किंवा प्रवासात काही अडचणींना सामोरे जावे लागत होते. रात्रीच्यावेळी नमन मंडळ व कलावंताना प्रवासादरम्यान पासची सुविधा उपलब्ध होत नसल्याने या समस्येला सामोरे जावे लागत होते. पण कोकण लोककला नमन मंडळाने ते पास मिळण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यांमुळे होणारी गैरसोय दुर झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.