मुंबई:-वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या टी-20 मालिकेसाठी विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे.
संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे.
टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया
अर्शदीप-बिश्नोईचे कमबॅक
इशान किशन (विकेटकीप), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीप), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसोटी संघात समावेश झाल्यानंतर यशस्वी जैस्वालला टी-20 संघातही संधी देण्यात आली आहे. IPL 2023 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल यशस्वी जैस्वालला पुरस्कृत करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्ससाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या तिलक वर्मालाही टीम इंडियाने पहिल्यांदाच संघात घेतले आहे. तिलकने इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या हंगामात ११ सामन्यात १६४ च्या स्ट्राइक रेटने ३४३ धावा केल्या. त्याचवेळी यशस्वीने १४ सामन्यात ६२५धावा केल्या.
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांनी कॅरेबियन संघाविरुद्ध निवडलेल्या टी-20 संघात पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर कुलदीप यादवचाही संघात समावेश करण्यात आला आहे. IPL 2023 मध्ये निराशाजनक कामगिरी करूनही उमरान मलिकला संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे. त्याचबरोबर आवेश खान आणि मुकेश कुमार यांनाही संघात ठेवण्यात आले आहे. टी-20 मालिका ३ ऑगस्टपासून सुरू होणार असून शेवटचा सामना १३ ऑगस्टला होणार आहे.
भारत-वेस्ट इंंडिज टी-20 मालिकेचे वेळापत्रक
भारत – वेस्ट इंडिज टी-20 मालिकेला ३ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर दुसरा सामना ६ ऑगस्टला, तिसरा सामना ८ ऑगस्टला होणार आहे. तर १२ आणि १३ ऑगस्ट रोजी होणार्या शेवटच्या दोन सामन्यांचे आयोजन अमेरिका करणार आहे. हे सामने फ्लोरिडा येथे होणार आहेत. टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघ कॅरेबियन संघाशी दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.