प्रतिबंधात्मक उपायोजनेची मागणी; आरोग्य विभागाकडे तक्रार नाही
रत्नागिरी:-शहरातील परटवणे परिसरात तसेच संत गाडगेबाबा नगर परिसरात मलेरिया आणि डेंग्यूसदृश साथीचा प्रादुर्भाव असून दररोज नवीन रुग्ण सापडत आहेत.या साथीला आळा घालण्यासाठी आरोग्य खात्याने तातडीने रोगप्रतिबंधक उपाययोजना हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पालिकेने या भागात डास प्रतिबंधक फवारणी मोहीम युद्धपातळीवर हाती घ्यावी,अशी नागरिकांची मागणी आहे.
गेल्या अनेक वर्षापासून उद्यमनगर येथून वाहणाऱ्या नाल्याच्या परिसरात नवीन अपार्टमेंट आणि बांधकामे झाली. त्याचे सांडपाणी तसेच शौचालयाचे मलनिःसारण या नदीत बेफिकीरपणे सोडले जात आहे. त्यामुळे संपूर्ण घाण आणि दुर्गंधीयुक्त अस्वच्छ पाणी परटवणे विभागातून वाहणाऱ्या नाल्यातून वाहत येऊन नदीकाठच्या विहिरींचे पाणी दूषित होऊन ते नागरिकांच्या वापरात येत असल्याने हे दूषित पाणी प्यायल्याने डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच परटवणे परिसरातील लोक या पऱ्यावर कपडे धुण्यासाठी जातात आणि मुले पाण्यात पोहण्यासाठी जातात; मात्र दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे त्यांना चर्मरोगाला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांनी स्वच्छ आणि गाळून उकळलेले पाणी प्यावे, असे स्थानिक नागरिकाचे आपल्या सहकाऱ्यांना आवाहन आहे. आरोग्यखात्याने त्याची गंभीर दखल घेऊन साथीचे रोग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच जिल्हा प्रशासनाने आणि संबंधित यंत्रणांनी पटवणे नदीच्या नाल्यात सोडण्यात येणाऱ्या शौचालय आणि घरातील सांडपाण्याची पाहणी करून संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अन्यथा स्थानिक नागरिक नगर पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. उद्यमनगर आणि एमआयडीसी परिसरात मोठमोठे उद्योग प्रकल्प उभे राहत असून त्याचेही सांडपाणी या नाल्यात सोडले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. एमआयडीसीने त्याचीही तातडीने पाहणी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
याबाबत पालिकेकडे चौकशी केली असता आरोग्य विभागाने साथीबाबत साफ इन्कार केला. अशा प्रकारे आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. परंतु नागरिकांचे म्हणणे असेल तर आम्ही तत्काळ डास प्रतिबंधक फवारणीची मोहिम सुरू करतो.