मुंबई:- राज्याच्या राजकारणात नवनवीन ब्रेकिंग बातम्या वाचायला, पहायला, ऐकायला मिळत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या राजकारणात आज आणखी एक मोठी घडामोड होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या स्वागताला गैरहजर राहिले आहेत. थोड्याच वेळात ते मोठी घोषणा करण्याची शक्यता. त्यांच्या या घोषणेकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
काल मध्यरात्रीच शिंदे हे तातडीने मुंबईला आले आहेत. शिंदे हे आपल्या गटातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते मोठी घोषणा करण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आल्या आहेत. काल त्यांचे नागपूरला आगमन झाले. त्यांच्या स्वागतावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. मात्र, आज राष्ट्रपती नागपूरहून गडचिरोली येथे आले. त्यांच्या स्वागताला मुख्यमंत्री शिंदे गैरहजर राहिले. त्यामुळे चर्चांना जोरदार उधाण आले आहे.
अजित पवारांच्या एण्ट्रीने नाराजी
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासोबत आलेल्या आठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ज्या राष्ट्रवादीसोबत कधीही युती करणार नाही, असा निर्धार करणाऱ्या देवेंद्र फडणविसांनी राष्ट्रवादीच्याच दिग्गज नेत्यांना जवळ केले. पण हा सगळा राजकारणाचा भाग म्हणून बाजुला ठेवला तरीही शिंदे गटाचे पुढे काय होणार? हा प्रश्न मोठा आणि महत्त्वाचा मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी शपथ घेतली ते सगळे दिग्गज नेते आहेत. त्या साऱ्यांकडे छोटी खाती जाणे शक्यच नाही. त्यांच्याकडे मोठीच खाती जाणार, अशात शिंदे गट आणि भाजपमधील जे आमदार मंत्रीपदाची आस लावून बसलेले आहेत, त्यांच्या वाट्याला कोणती खाती येतील, असा प्रश्न आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी त्यांच्या गटातील आमदारांची बैठक झाली. या बैठकीत खातेवाटपासाठी दबाव आणण्याचा आग्रह सर्वांनी शिंदेंना केला. मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, संजय शिरसाट या नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांपूर्वी आपल्या नेत्यांचे खातेवाटप व्हावे, यासाठी हे सगळे आग्रही होते. त्यासाठी फडणवीस यांच्यावर दबाव आणला जावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र, बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अजित पवार आणि राष्ट्रवादी हे सत्तेत येणे अतिशय चुकीचे आहे.
अजितदादांना काय मिळणार?
अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले असले तरीही त्यांच्याकडे कोणती खाती जाणार, याची उत्सुकता आहे. स्वतः फडणवीस आपली खाती त्यांच्याकडे देणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील खाती काढून अजितदादांना देणार, हे वेळच सांगेल.
जाहिरातीचा परिणाम
एकनाथ शिंदे गटाकडून गेल्या महिन्यात सर्वत्र जाहिराती करण्यात आल्या. त्यात शिंदे हे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा शिंदे यांना जनतेची पसंती असल्याचे सांगण्यात आले. ही बाब फडणवीस आणि भाजपच्या जिव्हारी लागली. तेव्हापासूनच अजित पवार यांच्या एण्ट्रीच्या हालचाली आखण्यात आल्याचे बोलले जाते.
या जिल्ह्यांमध्ये मतभेद
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रायगड, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मतभेद आहेत. आगामी निवडणुका एकत्र लढायच्या असतील तर उमेदवारीवरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कोण एक पाऊल मागे घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
याला काय अर्थ?
राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेनेच्या लोकांची कामे करत नाहीत, त्यांच्या जिल्ह्यांना योग्य निधी देत नाहीत, असा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली आणि भाजपसोबत हात मिळवला. आता एक वर्षानंतर पुन्हा त्याच लोकांसोबत काम करायचे म्हणजे स्वतःचीच गळचेपी करून घेण्यासारखे आहे, अशी भावना शिंदे गटातील आमदारांनी व्यक्त केली आहे.
शिंदे बाहेर पडणार?
एकनाथ शिंदे हे आपल्या पदाधिकाऱ्यांसमवेत आज बैठक घेत आहेत. या बैठकीला त्यांनी सर्वांनाच निमंत्रित केले आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. अजित पवार यांच्या एण्ट्रीमुळे अनेक बाबींना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडण्यासंदर्भात शिंदे हे ठोस निर्णय घेणार असल्याचे बोलले जाते.