मुंबई:- धावत्या रेल्वेतून चार कोटीहून अधिक सुवर्णलंकाराची चोरी करणाऱ्या टोळीला कोकण रेल्वे पोलिसांनी जेरंबद केले. संदीप भोसले (४०, सांगली), अक्षय चिनवाल (२८, खानापूर, बेळगाव), अर्चना ऊर्फ अर्ची मोरे (४२, नवी मुंबई) आणि धनपत बेड (४४, मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत.
कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वरील कामगिरी केली. गेल्या २ मे रोजी काणकोण रेल्वेस्थानकावर चोरीची घटना घडली होती. मूळ मुंबईतील नागपाडा येथील अशोक आर मुंबईतील मधु ओर्नामेन्टस्मध्ये ऑफिसबॉय म्हणून कामाला आहे. संपत जैन यांचे चार कोटी रुपये किमतीचे सात किलो सोने (बांगड्या) ट्रॉली बॅगमध्ये घेउन ते पनवेलहून तिरुवनंतपुरमला गांधीधाम तिरुनेलवेली हमसफर सुपरफास्ट रेल्वेतून प्रवास करीत होते. काणकोण येथे क्रॉसिंगमुळे गाडी थांबली असता त्याचे सुवर्णलंकार चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंद झाल्यानंतर कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक गुरुदास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गुरुदास कदम, पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या पथकाने तपासकामाला सुरुवात केली. पोलिसांनी सांगलीला जाऊन संदीप भोसले आणि अक्षय चिनवाल यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी २८ जून रोजी ही कारवाई केली. संशयिताकडील दोन महागड्या कार आणि दोन मोबाइल जप्त करण्यात आले. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना गोव्यात नेऊन काणकोणच्या प्रथमवर्ग न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना सात दिवस पोलीस कोठडी देण्यात आली.