रत्नागिरी:- इतर कोणी काही म्हणेल याचा विचार न करता जिद्दीने आणि मेहनतीने वाटचाल केली, तर ध्येयपूर्ती होते. जीवनात यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे, असा कानमंत्र रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ चे माजी गव्हर्नर हरजित सिंग तलवार यांनी रोटरी क्लबच्या सदस्यांना दिला.
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा नव्या वर्षाचा पदग्रहण सोहळा संगम हॉलमध्ये मोठ्या थाटात आणि उत्साहात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून श्रीकांत भुर्के, सचिव प्रमोद कुलकर्णी, खजिनदार प्रकल्प आराध्ये आणि सर्व बोर्ड डायरेक्टरनी श्री. तलवार यांच्या हस्ते पदभार स्वीकारला. श्री. तलवार पुढे म्हणाले की, व्यावसायिक किंवा सर्वसामान्य नागरिकांनीही स्वतःचा विचार करावा. आपला विचार पक्का आणि योग्य असेल, तर त्याच मार्गाने ध्येयाकडे वाटचाल करावी. त्यातून यश नक्की मिळते.
यावेळी रोटरी ३१७० डिस्ट्रिक्टचे असिस्टंट गव्हर्नर डॉ. केतन चौधरी यांनी नव्या कार्यकारिणीला बहुमूल्य सूचना केल्या. मावळते अध्यक्ष राजेंद्र घाग, सचिव रूपेश पेडणेकर यांनी वर्षभराच्या कामकाजाचा आढावा घेतला. रोटरी क्लबचा विशेष प्रकल्प म्हणून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला नवजात बालकांच्या विशेष शुश्रूषेकरिता एनआयसीयू (नीओनॅटल इन्टेन्सिव्ह केअर युनिट) सुरू करून देण्यात येणार असल्याची माहिती श्री. घाग यांनी दिली. या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळविणारे रोटरी सदस्य नीलेश मुळे, सचिन शिंदे, सौ. नीता शिंदे, दिलीप भाटकर, सौ. दीप्ती भाटकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नूतन अध्यक्षांनी आगामी वर्षभरात आयोजित करणार असलेल्या समाजोपयोगी कामांची माहिती देऊन दिली.
समारंभात विशेष कामगिरी करणाऱ्या विशाल भावे, प्रमोद कोनकर, अक्षय फाटक आणि सौ. स्वप्नजा मोहिते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विविध परीक्षा, स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळालेल्या ओम काळोखे, अथर्व भागवत, आरोही भागवत, सौम्या मुकादम, आर्यन वेल्हाळ या रोटरी सदस्यांच्या मुलांचाही गौरव करण्यात आला. चार नव्या रोटरी सदस्यांचे रोटरी पिन देऊन स्वागत करण्यात आले. स्वतःच्या कामात विशेष पुरस्कार मिळवलेले केशव इंदुलकर आणि मुकेश गुप्ता या ज्येष्ठ रोटरी सदस्यांनाही सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला रोटरी सदस्य माधुरी कळंबटे, वेदा मुकादम, नीता शिंदे आणि ऋता पंडित यांनी केले. कार्यक्रमाला सर्व रोटरी सदस्य आणि परिवार, रोटरी क्लब ऑफ मिडटाउनचे सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.